लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भोकरदन, जाफराबाद, मंठा आणि परतूर तालुक्यात गुरूवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून जाणसोबतच झाडे उन्मळून पडल्याने दाणादाण उडाली. सुमारे अर्धातास पाऊस सुरू होता. दरम्यान, जालना शहरातही साडेचार वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मान्सून लवकरच दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांत पावसाबाबत उत्सुकता आहे. मे महिन्यात उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेल्याने उकाड्याचे प्रमाणही जास्त होते. एकूणच उन्हाच्या तीव्रतेने यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. चारही तालुक्यांत दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. दुपारनंतर भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा परिसरातील अनेक गावांत जोरदार पावसाने हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बदनापूर, अंबड, घनसावंगी परिसरात पाच वाजेपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. अवकाळीच्या तडाख्याने ग्रामीण भागात चांगलची दाणादाण उडाली. वारे आणि पावसाचा जोर जास्त असल्यामुळे घरावरील पत्रे उडून जाण्यासोबतच वीज खांब वाकले, झाडे उन्मळून पडली. अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. पावसाच्या भीतीने फळविक्रेत्यांची पळापळ दिसून आली. भोकरदन तालुक्यातील दुपारी साडेचार वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी साडेपाच वाजता शहरासह परिसरातील हसनाबाद, नांजा, फत्तेपूर, जोमाळा, गारखेडा, लिंगेवाडी, कुंभारी, निमगाव, खंडाळा आदी गावांत ४० मिनिटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी, खापरखेडा, नळणी, तळणी आदी परिसरात अर्धातास पाऊस झाला. बच्चेकंपनीनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. परतूर शहरासह तालुक्यातील बावणे पांगरी शिवार, शेवगा, आनंद वाडी आदी परिसरात जोदरार पाऊस झाला. शहरातील मोंढा परिसरातील चांगला पाऊस झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते.मंठा तालुक्यातील तळणी परिसरात साडेचार वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. २० मिनिटे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या तीव्रतेने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळला. तालुक्यातील उस्वद परिसरात सुध्दा रिमझिम पाऊस झाल्याची माहिती आहे. जालना शहरात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होऊन रिमझिम पाऊस झाला. बदनापूर तालुक्यात पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण होते.
अवकाळी पावसाने तारांबळ!
By admin | Updated: May 26, 2017 00:41 IST