बीड : उपलब्ध पाणी साठ्याच्या जोरावर यंदा सर्व पिके जोमात होती. उशिराच्या पेऱ्यामुळे महिनाभराने हंगाम लांबला असला तरी सद्य:स्थितीत ज्वारी, गहू, हरभरा, जवस, करडई आदी पिकांच्या काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना भरीव उत्पन्नाची आशा आहे.खरिपाच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील पिकेही यंदाच्या रबीत जोमात होती. सुमारे १ लाख ९२ हजार ५०० हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला होता, तर गहू, मका, हरभरा, करडईनेही यंदा सरासरी ओलांडली होती. रबी हंगामातील पिकांना चार ते पाच वेळी पाणी मिळाले होते. खरिपात झालेले नुकसान रबीच्या पिकांनी काही प्रमाणात भरून काढले आहे. काढणीची कामे जोमात सुरू असली तरी वाढीव उत्पादन निश्चित मानले जात आहे. योग्य वेळी पाणी मिळाल्याने ज्वारी काढण्यासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे.रबीचे क्षेत्र त्वरित रिकामे करून उन्हाळी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी भुईमूग, मूग, उडीद आदी पिकांची लागवड झाली आहे. मात्र, पोषक वातावरण नसल्याने मूग, उडिदाची वाढ खुंटली असून, तण वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.चारा पिके जोमातउन्हाळ्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मका, घास यावर भर दिला आहे. गतवर्षी हिरवा चारा न मिळाल्याने दुग्धव्यवसायावर परिणाम झाला होता. कडब्याच्या रूपाने चारा उपलब्ध झाला असून, मक्याने त्यात भर घातली आहे. उन्हाळी हंगामातील वातवरण पोषक आहे. (प्रतिनिधी)
रबी हंगाम अंतिम टप्प्यात
By admin | Updated: March 14, 2017 23:43 IST