उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३५६ गावांतील रबी पिकांची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून ती ४४ पैसे इतकी आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. पावसाअभावी पेरणीस झालेला उशिर तर काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने रबीच्याउत्पादनामध्ये घट झाली आहे. यंदा सरासरीच्या पन्नास टक्केही पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे रबीच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अत्यल्प पावसामुळे स्त्रोतांच्या पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. परिणामी पाण्याअभावी रबीची पिकेही करपून गेली. त्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात ७३७ महसुली गावे आहेत. त्यापैकी खरीप पेरणी पिकाखालील ३६२ तर रबीच्या पिकाखाली पावणेचारशे गावे आहेत. कळंब तालुक्यातील १९ गावांची रबी पेरणी गावात खरीप पिकांचा पेरा २/३ पेक्षा जास्त असल्यामुळे पैसेवारी जाहीर करण्यात आली होती.दरम्यान, उर्वरित ३५६ गावांतील रबी पिकांची अंतिम पैसेवारी काढण्यात आलेली आहे.यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ६९, तुळजापूर ४७, , भूम ९०, लोहारा १०, वाशी २३ आणि परंडा तालुक्यातील ९६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आल्याचे समोर आले आहे. तसा अहवाल तहसीलदारांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी सात तालुक्यांतील ३५६ गावांची रबी पिकांची पैसेवारी ४४ पैसे इतकी जाहीर केली आहे. हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रबी पेरणीची ३७५ गावे असून त्यापैकी कळंब तालुक्यातील १९ गावातील रबी पेरा २/३ पेक्षा जास्त पेरणी खरीप हंगामात झालेली असल्यामुळे त्या गावाची पैसेवारी खरीप हंगामात जाहीर केली असल्याने, सदर गावाची रबी हंगामाची पैसेवारी निरंक आहे. (प्रतिनिधी)
अंतिम पैसेवारी ४४ पैसे
By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST