चाकूर : तालुक्यातील हाडोळी येथील शहीद जवान संतोष गोपीनाथराव शिंदे यांना बुधवारी साश्रु नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला़ अहमदनगरच्या सैन्य दलाच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली़ शहीद संतोष शिंदे अमर रहे, अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या़तालुक्यातील हाडोळी येथील संतोष शिंदे हे २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले होते़ १२१ इंजिनिअरींग रिजमेन्टमध्ये ते काम करीत होते़ सध्या ते सिक्कीम येथे होते़ भारत चीन सिमेवरील १२ हजार फुट उंचीच्या ठिकाणी ते आपल्या सहकाऱ्यासमवेत मोहिमेवर असताना शरिराला आॅक्सिजन पुरेसे न मिळाल्याने ते रविवारी शहीद झाले़ त्यांचे पार्थिव दिल्ली - हैदराबाद विमानाने आणण्यात आले़ हैदराबाद येथून एका रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी हाडोळी येथे आणण्यात आले़ यावेळी गावातील नागरिकांनी टाहो फोडला़ शहीद शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पार्थिवास त्यांचे बंधू दत्ता शिंदे यांनी भडाग्नी दिला़ दरम्यान पोलिस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, गटविकास अधिकारी नंदकुमार शेरखाने यांनी पुष्पचक्र वाहिले़ त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक केंद्रे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, दिलीपराव देशमुख, सुधाकरराव नागरगोजे, नगरसेवक डॉ़सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, इलिहास सय्यद, मुख्याध्यापक जनार्धन इजारे, अनिल वाडकर, मधुकर कांबळे आदींची उपस्थिती होती़ (वार्ताहर)
शहीद संतोष शिंदे यांना अखेरचा निरोप
By admin | Updated: October 12, 2016 23:30 IST