बीड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांना माघार घेण्यासाठी मंगळवारी शेवटची संधी आहे. सकाळी ११ वाजता प्रक्रियेस सुरूवात होणार असून, तीन वाजेपर्यंत चालणार आहे. साडेतीननंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याचे निवडणूक सहायक अधिकारी छाया पवार यांनी सांगितले.जिल्ह्यातील ६० जि. प. गटामधून छानणीनंतर ५५० उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते, तर १२० पं. स. साठी १७११ अर्ज दाखल आहेत. एकूण उमेदवारी अर्जापैकी माघार घेण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करीत असल्याचेही चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया चालणार आहे. साडेतीननंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मागील दोन दिवसांमध्ये अर्ज मागे घेण्यासाठी लागणारा फॉर्म अपक्ष उमेदवार तसेच ज्यांना एबी फॉर्म पक्षाने दिला नाही असे अनेक जण घेऊन गेले असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
By admin | Updated: February 6, 2017 23:04 IST