परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे़ परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या टाकळी कुंभकर्ण येथे मागील काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विहीर नदीपात्रात आहे़ परंतु, ही विहीरही कोरडीठाक पडली आहे़ गावातील विंधन विहिरी, खाजगी बोअर आणि शासकीय बोअरही कोरडे पडले आहेत़ त्यामुळे गावात पाणी उपलब्ध नाही़ नळ योजनेद्वारे पाणी मिळत नाही आणि परिसरातील शेत शिवारामध्ये पाणी उपलब्ध नाही़ त्यामुळे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे़ परिसरात कोठेही जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे़ मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना हे ग्रामस्थ करीत आहेत़ परंतु, आता मात्र परिस्थिती अधिकच तीव्र झाल्याने या ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे धाव घेतली असून, पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ (प्रतिनिधी)
पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
By admin | Updated: December 23, 2015 23:41 IST