भूम/नळदुर्ग : येथील एका होलसेल दुकानाचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी ९६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथेही चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर उचकटून आतील साहित्य व रक्कम लंपास केली. पोलिसांनी सांगितले की, शहरातील वेताळनगर रोडवर संतोष महादेव रोकडे यांचे साई गोळी सेंटर नावाचे दुकान आहे़ या दुकानाचे साहित्य ठेवण्यासाठी जवळच त्यांचे गोडाऊन आहे़ या गोडाऊनचे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास शटर उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ आतील विविध मालाचे साहित्य असा ९६ हजार रूपयांचा माल लंपास करण्यात आला़ स्वातंत्र्यदिनी सकाळी ही घटना समोर आली़ या प्रकरणी संतोष रोकडे यांच्या फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहेत़ (वार्ताहर)नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ किराणा दुकान फोडून रोख रक्कमेसह साहित्य लंपास केले़ तर दुचाकी, सायकलही चोरून नेवून इतरत्र फेकून दिली़ मिळालेल्या माहितीनुसार, अणदूर येथील अण्णा चौकात निशिकांत मुळे यांचे किराणा दुकान आहे़ शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला़ आतील गल्ल्यातील रोख रक्कम व साहित्य असा आठ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच अमोल गुड्ड यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेत राष्ट्रीय महामार्गावरील चिवरी फाट्यावर टाकून दिली़ तर रवी घोडके यांच्या घरासमोरील सायकल चोरून नेत बाजूच्या शेतात नेवून टाकली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़
भूम, अणदुरात चोरट्यांचा धुमाकूळ
By admin | Updated: August 17, 2014 01:04 IST