संजय कुलकर्णी , जालनाभूमि अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक व उपअधीक्षक या दोन्ही कार्यालयांचा कारभार आता इनकॅमेरा चालणार आहे. कारण या कार्यालयांमध्ये नवीन सहा सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यातील अनेक नागरिक येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या दोन्ही कार्यालयांमध्ये कामानिमित्त दररोज ये-जा करतात. परंतु या कार्यालयात नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होतात. तर काहीवेळा संतप्त नागरिकांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमक्या देण्याचे प्रकारही घडतात. या पार्श्वभूमीवर काही पदांवरील कर्मचारी सतत गैरहजर असतात. तर काहीजण दैनंदिन कामे चक्क सुटीच्या दिवशी येऊन करतात. अनेक नागरिकांची पीआरकार्ड, नामांतर, जागेची मोजणी, बोजा टाकणे व उतरविणे इत्यादी कामे अद्यापही रेंगाळलेली आहेत. अशा स्थितीत या कार्यालयातील कामकाजासंदर्भात वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याचे खुद्द जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनीही गेल्या महिन्यात झालेल्या माहिती परिषदेत पत्रकारांशी बोलताना मान्य केले होते. फेबु्रवारी महिन्यात काही नागरिकांनी कामासंदर्भात भूमि अभिलेख उपअधीक्षकांना दोन तास घेराव घातला होता. त्यावेळी काहीजण अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे कार्यालयात गोंधळ उडाला होता. या प्रकाराच्या निषेधार्थ कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. भूमि अभिलेख उपअधीक्षकांचेच पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार भोकरदन येथील उपअधीक्षक वागुले यांच्याकडे आहे.या कार्यालयातील कामकाज व्यवस्थित व्हावे, नागरिकांना कागदपत्रे वेळेवर मिळावीत, यासाठी नवीन सहा सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा अधीक्षक एस.एस. इंदलकर व उपअधीक्षक वागुले यांच्या दालनात प्रत्येकी एक तसेच अधीक्षक व उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दालनासह पीआरकार्ड विभाग या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ४याबाबत जिल्हा अधीक्षक इंदलकर म्हणाले, बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भूमि अभिलेख कार्यालयांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
भूमि अभिलेख कार्यालयाचा कारभार आता ‘इनकॅमेरा’
By admin | Updated: April 13, 2015 00:46 IST