महावीर पांडे, कचनेरश्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, कचनेर येथे वार्षिक यात्रा महामहोत्सव सुरू असून, गुरुवारी मुख्य महामस्तकाभिषेक सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी हा क्षण डोळ्यात साठवून घेतला.५ नोव्हेंबरपासून या तीनदिवसीय यात्रोत्सवास प्रारंभ झाला. ६ नोव्हेंबर रोजी मुख्य सोहळा असल्याने कचनेरला पंढरीचे स्वरूप आले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सोहळ्याचे नियोजन केल्याने भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले.सकाळी ११ वा. बोलियाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी पंचामृत महामस्तकाभिषेकास प्रारंभ झाला. लाखो भाविकांच्या नजरा पांडुकशिलेवर विराजमान श्री चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांच्या मूर्तीकडे खिळून होत्या. णमोकार भक्तिमंडळाचे सुमधूर साग्रसंगीत व जैनमुनी प.पू. मनमितसागरजी महाराज, संयमसागरजी महाराज, प्रसन्नचंद्रसागर महाराज, आर्यिका आगमती माताजींच्या उपस्थितीत इंद्र-इंद्रायणींच्या हस्ते पंचामृत महामस्तकाभिषेक करण्यात आला. इंद्र-इंद्रायणीची बोली ओमप्रकाश सुरेंद्रकुमार, नरेंद्रकुमार पहाडे परिवार (जालना), जलाभिषेक-इंदरचंद, नीलेश, नितीन सेठी (औरंगाबाद), पुष्पवृष्टी-प्रियंका रमेशकुमार ठोळे (रांजणगाव), दुग्धाभिषेक-श्रेयांस नीलमकुमार अजमेरा परिवार (उस्मानाबाद) यांनी घेतली, तर मुख्य महाशांतीधारा करण्याचा मान सुनीलकुमार सुंदरलाल पाटणी परिवार अंधारीवाला यांना मिळाला. उपस्थित भाविकांना मनोजकुमार फुलचंद दगडा परिवार यांच्यातर्फे सलग ४ दिवस महाप्रसाद देण्यात येत आहे. याबद्दल अतिशय क्षेत्रातर्फे त्यांचा व यात्रेस सहकार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डी.यू. जैन, उपाध्यक्ष माणिकचंद गंगवाल, व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कासलीवाल, सचिव भरत ठोळे, सदस्य ललित पाटणी, प्रकाश पाटणी, महेंद्र काले, केशरीनाथ जैन, मनोज साहुजी, प्रवीण लोहाडे, प्राचार्य किरण मास्ट, दिलीप काला, संजय कासलीवाल, पुजारी रामदास जैन, श्रीपाल पहाडे, जयकुमार बाकलीवाल आदींसह आरोग्य, महावितरण, पोलीस, महसूल अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ, समाजबांधव आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन अशोक गंगवाल, प्रवीण लोहाडे, अशोक अजमेरा, सुरेश कासलीवाल यांनी केले.
कचनेर यात्रोत्सवाला लाखो भाविकांची हजेरी
By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST