जिंतूर : मागील दोन दिवसांपासून जिंतूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून ७ मे रोजीही चार ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यात १ लाखापेक्षा जास्त रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. शहरामध्ये ६ मे रोजी महालक्ष्मी फोडून ११ लाख २७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला होता. या चोरीच्या तपासाचे आव्हान जिंतूर पोलिसांना होते. सलग दुसर्या दिवशी चोरट्यांनी शहरातील विविध भागात चोरीचा प्रयत्न केला. जुनी मुनसबी भागातील मुलचंद चोटिया यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील विविध साड्या, सामान, सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले. मूलचंद चोटिया यांच्या घरातील सामान ग्रीन पार्क भागात चोरट्यांनी फेकून दिले. केवळ कानातील सोन्याचे फुल, चांदीचा ग्लास व पाच साड्या असा ११ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. यासंदर्भात जिंतूर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर ग्रीन पार्क भागातील शिवाजी विश्वनाथ गुट्टे यांच्या घराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र गस्तीवर असणार्या लोकांमुळे हा प्रयत्न फसला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जीवनराव राऊत या शिक्षकाच्या घराकडे वळविला. सदरील शिक्षक हे सुटी असल्यामुळे बाहेरगावी होते. त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त टाकण्यात आले असून घरातील किती रुपयांचे सामान पळविण्यात आले, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. तसेच शहरातील दत्ता कटारे यांची (एम.एच.२२-एबी ५९९३) ही दुचाकी चोरट्यांनी पळविली. एकाच रात्री शहरात चार ठिकाणी चोर्या झाल्या असतानाच तालुक्यातील गडदगव्हाण येथेही डॉ. भालेराव यांच्या निवासस्थानी चोरी झाली. यात सोन्या-चांदीच्या दागिन्यासह ३० ते ३५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. बुधवारी सकाळी चोरीच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर परभणी येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञास पाचारण करण्यात आले. परंतु,याचा फारसा उपयोग झाला नाही. शहरात झालेल्या वाढत्या चोर्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांबरोबरच व्यापार्यांतही असुरक्षिततेची भावना आहे. (प्रतिनिधी) चोरट्यांनी १३ एप्रिल रोजी जिंतूर शहरातील शेख अली या कापड व्यापार्याची दुचाकी, कपडे व साड्या चोरुन नेले होते. आज झालेल्या चोरीच्या वेळी याच दुचाकीचा वापर करण्यात आला. परंतु, चोरट्यांना कोणी तरी येत असल्याचा संशय आल्याने त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. ही दुचाकी १३ एप्रिल रोजी चोरी झालेल्या यांची असून या दुचाकीमुळे नेमके चोरटे कोण, याबाबतची प्राथमिक माहिती आहे. संशयितांना घेतले ताब्यात आज झालेल्या चोर्यांच्या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, पोलिस निरीक्षक के.पी.ओव्हाळ यांनी तपासाचे चक्रे फिरवत शहरातील काही संशयितांना ताब्यात घेतले. यापैकी एकास संशयितास पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर शहरामध्ये यापूर्वी केलेल्या तीन ते चार चोर्यांची कबुली दिल्याचे समजते. या चोरट्याच्या माहितीवरुनच पोलिसांना पुढील तपासाची दिशा मिळाली असून दोन दिवस घडलेल्या चोर्यांचा तपास लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
लाखाचा ऐवज लंपास
By admin | Updated: May 8, 2014 00:51 IST