औरंगाबाद : शेती व सहकाराच्या माध्यमातून एकेकाळी महाराष्ट्र हा आर्थिक संपन्न म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उसासाठी पाण्याचा बेसुमार उपसा व उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी आगामी काळात राज्यात पाणीबाणी अटळ आहे, असे प्रतिपादन स्टॉकहोम वॉटर पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्राच्या वतीने ‘वातावरणातील बदल व जल व्यवस्थापन’ या विषयावर गुरुवारी वेबिनार झाला. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांच्या २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्र कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ होते.
राजेंद्र सिंह म्हणाले, राज्यात पाणी मुलबक असताना त्याचे योग्य ते नियोजन होत नाही. दुसरीकडे जिरायती शेतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यासाठी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवला पाहिजे, जिरलेले पाणी योग्यरितीने वापरले पाहिजे, तरच हा समतोल साधला जाईल. ‘ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज’ हा या शतकातील कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले,
निजामाच्या जोखडातून मुक्त झालेल्या मराठवाड्यात शेती - सहकार या क्षेत्राची उभारणी व शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यात पोहचविण्याचे काम सहकारमहर्षि बाळासाहेब पवार यांनी केले. एकप्रकारे ग्रामीण मराठवाडा समृध्द व संपन्न करण्यात बाळासाहेब पवारांचे योगदान अतुलनीय आहे. अध्यक्षीय समारोप डॉ. श्याम शिरसाठ यांनी केला. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.
चौकट....
कार्यक्रमास मान्यवरांनी लावली हजेरी
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, उद्योजक मानसिंग पवार, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांच्यासह १४० संशोधक, प्राध्यापक, अभ्यासकांचा सहभाग होता.