लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत ‘बी’ व ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाचा तुटवडा असल्याचे रविवारी समोर आले आहे; परंतु शिबिरे घेणे सुरू असल्याने येत्या दोन दिवसांत ही कसर भरून काढली जाणार असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी रक्त संकलनात राज्यात अव्वल ठरलेली आहे. येथील अधिकारी, कर्मचारी शिबीर घेऊन, तसेच रक्तदात्यांना आवाहन करून रक्त संकलनासाठी धावपळ करीत असतात. मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेले जिल्हा रुग्णालयातील समन्वयक हे पद नुकतेच भरले आहे. त्यामुळे याचा फायदा होणार आहे.सध्या जयंती, उत्सव, कार्यक्रम, वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक जण रक्तदान करतात; परंतु ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शिबिरांची संख्या वाढत असली तरी रक्तदात्यांचा आकडा मात्र पूर्वीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी संपर्क झाला नाही.
जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:07 IST