औरंगाबाद : दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने घरातून चाकू आणला अन् दुसऱ्याच्या कपाळावर मारला. त्या तरुणाच्या दोन भुवयांमध्ये घुसलेला हा चाकू तब्बल सहा तास तसाच अडकून होता. शेवटी घाटीच्या डाक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकू काढला. हल्ला करणाऱ्या नवल किशोर चिलवार (रा. गवळीपुरा, छावणी) याला छावणी पोलिसांनी अटक केली आहे, तर या हल्ल्यात जखमी झालेल्या सचिन ऊर्फ पापा अनिल शेलार (२९, रा. गवळीपुरा) याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.नवल आणि सचिन यांच्यात शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरून गवळीपुऱ्यात वाद झाला. तेथे काही जणांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. त्यानंतर जाब विचारण्यासाठी सचिन हा नवलच्या घरी पोहोचला. तेथे परत दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा नवलने धावत घरात जाऊन चाकू आणला आणि सरळ सचिनच्या डोक्यावर वार केला. तो चाकू सचिनच्या भुवयांच्या मधोमध कपाळात घुसला. त्याचवेळी चाकूची मूठ तुटली. क्षणात सचिन खाली कोसळला. नागरिकांनी सचिनच्या कपाळात घुसलेला चाकू काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो निघेना. त्याला त्याच अवस्थेत घाटीत आणण्यात आले. तब्बल सहा तासांनंतर डॉक्टरांनी शत्रक्रिया करून त्याच्या कपाळातील चाकू बाहेर काढाला. या प्रकरणी आरोपी नवलविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले.
सहा तास कपाळातच होता चाकू!
By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST