औरंगाबाद : महापालिकेच्या येत्या आर्थिक वर्षाच्या बजेटवरून सेना-भाजप युतीमध्ये खेचाखेची होण्याची दाट शक्यता आहे. तर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी गुरुवारी सभापती दिलीप थोरात यांच्या दालनात बजेटवरून सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. बजेटमध्ये सुधारणा न केल्यास वेगळ्या विचारांचा सूर भाजपच्या गोटातून आळविण्यात आला. भाजपच्या बैठकीमुळे सेनेच्या गोटात खळबळ माजली असून, गुरुवारच्या बैठकीवर सेनेकडून कुणीही बोलण्यास तयार नाही. चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना प्रशासनाने भेदभाव केला आहे. काही वॉर्डांना कोट्यवधी रुपयांचा तर काही वॉर्डांना निधीच दिला नसल्याचा आरोप सभापती थोरात यांनी केला. प्रशासनाने सुधारणा करून नव्याने अंदाजपत्रक सादर करावे, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बुधवारी २०१६-१७ चे ७७७ कोटी ७४ लाख ४७ हजार रुपये जमा तर ७७७ कोटी ५२ लाख ९५ हजार रुपये खर्च, असे २१ लाख ५२ हजार रुपये शिलकीचे मूळ अंदाजपत्रक सभापतींना सादर केले होते. त्यानंतर गुरुवारी सभापतींच्या दालनात भाजप नगरसेवकांची पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन तास बैठक झाली. थोरात म्हणाले की, प्रशासनाने वरून स्मार्ट वाटणारे बजेट सादर केले असले तरी वॉर्डांतील विकासकामांना निधी देताना दुजाभाव केला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांत संताप आहे.
बजेटवरून खेचाखेची
By admin | Updated: March 19, 2016 01:08 IST