बीड : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अतिवृष्टीमुळे एका रात्रीत चित्र पलटले होते. खरीपातील तुरीला या पावसामुळे पोषक वातावरण तयार झाल्याने एकरी उत्पदादनही वाढले आहे. शिवाय मुबलक पाणीसाठ्याच्या जोरावर रबीतील गव्हाचे पिक जोमात आहे. या प्रमुख पिकांनी तारल्याने शेतकरी सुखावला आहे. खरीपातील सर्वच पिकांची अवस्था तळ्यात-मळ्यात अशी होती. त्या अतिवृष्टीमुळे हरभरा, बाजरी पिक जमिनदोस्त झाले होते. केवळ तुरीला पावसाचा फायदा झाल्याने उत्पादनात वाढ होत आहे. सद्य स्थितीला तुरीची काढणी अंतिम टप्प्यातून असून, गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत येथील कृउबाच्या खरेदी केंद्रावर तब्बल २९ हजार क्ंिवटलची आवक झाली आहे. दिवसाकाठी दोन हजार क्विंटल तूर दाखल होत असून, गतवर्षी केवळ सहा हजार क्विंटल तुरीचे उत्पादन झाले होते. यंदा पाच पटीने उत्पादन वाढले आहे. रबीतील गव्हाचा पेरा ४० हजार हेक्टरवर झाला आहे. सर्वच पिके उत्तम स्थितीत असून, मुबलक प्रमाणावर पाणी मिळत असल्याने गहू जोमात आहे. त्यामुळे रबीतील काही पिके वगळता अतिवृष्टीचा फायदाच झाला आहे. पाणी साठे तुडूंब भरले असून, शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवला आहे. तुरीला खरेदी केंद्रांवर ५०५० रूपये दर मिळत असून, एकरी उत्पादनही अधिक प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारत आहे. (प्रतिनिधी)
खरीपात तूर, रबीत गव्हाने शेतकरी आशादायी
By admin | Updated: February 5, 2017 23:25 IST