सेनगाव : एक महिन्यापासून पावसाने कायम दडी मारली असून गेल्या आठवड्यात रिमझिम पावसात निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी जोखीम स्वीकारत पेरण्या आटोपल्या. अशा स्थितीत तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर उर्वरित पेरण्या पुन्हा रखडल्या असून दुबार पेरणीचे संकटही घोंघावत असल्याचे चित्र सेनगाव तालुक्यात निर्माण झाले आहे.मान्सून वेळीच सक्रिय झाला नसल्याने सेनगाव तालुक्यात तब्बल एक ते दीड महिन्याने रिमझिम पाऊस पडत आहे. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी हंगामाला एक महिना विलंब झाला असताना रिमझिम पावसानेही दडी मारल्याने गंभीर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यात आजपर्यंत १११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.गेल्या आठवड्यात एकूण ९२ हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी ४८ हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. सरासरी ५० टक्के क्षेत्रात अल्पश: पावसावर पेरणी करण्याची जोखीम शेतकऱ्यांनी पत्करली असताना २४ जुलैपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने उर्वरित पेरण्या पुन्हा अपूर्ण राहिल्या आहेत. तर जोखीम पत्करून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. सोयाबीन, कापूस या पिकांचा पेरणी हंगाम संपला आहे. अशा बिकट स्थितीत काही पेरण्या झाल्या तर काही पेरण्या आॅगस्ट महिना उजाडत असताना होणे बाकी आहेत. मागील पाच वर्षांहून अधिक काळापासून कधी नव्हे, एवढे गंभीर संकट निर्माण झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी गावोगावी देवदेवतांना साकडे घातले जात आहे. गावागावात पावसासाठी साकडे घातले जात असून अन्नदानाच्या कार्यक्रमाची रेलचेल तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू आहे; परंतु पाऊस मात्र पडत नसल्याची स्थिती आहे. सेनगाव, गोरेगाव, पुसेगाव, साखरा, कापडसिनगी, केंद्रा बु., पानकनेरगाव, कवठा, जयपूर, वरुड चक्रपान, जवळा बु., दत्ता, आडोळ या सर्व भागात दुष्काळाचे सावट आहे. नदी- नाले कोरडे असून जनावरांचा चाऱ्यांचा प्रश्नही तीव्र आहे. यासाठी प्रशासनाने या वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. (वार्ताहर)
खरिपाच्या पेरण्या अपूर्ण; हंगामावर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: July 28, 2014 01:01 IST