केऱ्हाळा : महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका केऱ्हाळा येथील गावकऱ्यांना सहन करावा लागला आहे. मागील दहा दिवसांपासून निम्मे केऱ्हाळा गाव अंधारात असून, गावकऱ्यांनी महावितरणविरोधात संताप व्यक्त केला आहे.
केऱ्हाळा गावाला वीज पुरवठा करण्यासाठी विविध भागात बारा ठिकाणी सिंगल फेज ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहे. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून येथील या सिंगल फेजमध्ये कायम बिघाड होत आहे. त्यात दहा दिवसांपासून केऱ्हाळा गाव अंधारात गेले आहे, तर कधी कधी अर्ध्या गावात वीज येते, तर अर्धे गाव अंधारात असते. यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाने गावातील उघड्या डीपींचे कट झालेले केबल, अनेक भागातील जीर्ण झालेले वायर काढण्यात यावे, अशी मागणी महावितरणकडे केली आहे. तर महावितरण कार्यालयाने ग्रामपंचायतीच्या मागणी पत्राला केराची टोपली दाखविली. त्यामुळे ग्रामपंचायतीची मागणी जर मान्य केली नाही, तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न गावकरी विचारू लागले आहेत.
या भागातील ट्रान्सफार्मर नादुरुस्त
महादेव मळा डीपीवरील एक, बाजार पेठेतील दोन, नदीच्या डीपीवरील एक अशा चार ठिकाणी ट्रान्सफार्मर नादुरुस्त आहे. त्यामुळे गावात कायम अंधार असतो.
पाणीपुरवठ्यासाठी हवा एक्स्प्रेस लाईन
केऱ्हाळा, पळशी, कायगांव, निल्लोड या चार गावाला निल्लोड पाझर तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. लोडशेंडिग असल्यामुळे रात्री विद्युतपंप चालू करायला जावे लागते. परिणामी एखाद्या वेळेला तांत्रिक बिगाड झाल्यास अख्ख गांव पाण्यापासून वंचित राहते. त्यामुळे गावात एक्स्प्रेस लाईन बसविण्यात यावी, अशी मागणी सरपंच सविता कुडके यांनी उपअभियंता यांच्याकडे केली आहे.
फोटो- मागील दहा दिवसांपासून मुख्य बाजार पेठेतील रोहित्र नादुरुस्त झाले आहे.
250221\img-20210225-wa0119_1.jpg
केऱ्हाळा दहा दिवसांपासून अंधारात