-----------------------------
नगर रोडवर खोदकामामुळे वाहतूक कोंडी
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर रोडवर गॅसलाइन टाकण्यासाठी खोदकाम केले जात असल्याने या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. गत पंधरा दिवसांपासून गॅसलाइनसाठी खोदकाम सुरू असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामानंतर मलबा व्यवस्थितपणे हटविला जात नसल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.
------------------------
सिडकोतील ड्रेनेजचा प्रश्न सोडवा
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील एलआयजीमधील ड्रेनेजलाइनचे भिजत घोंगडे तसेच असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागातील डी ९६/१ व डी ९८/०४ या परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे.
----------------------------
म्हाडा कॉलनीत बुद्ध पौर्णिमा
वाळूज महानगर : तीसगाव परिसरातील म्हाडा कॉलनीत बुद्ध पौर्णिमा साधेपणाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामूहिक त्रिशरण, पंचशील घेण्यात आले. याप्रसंगी पवन दाभाडे, ए. जी. कांबळे आदींसह समाजबांधवांची उपस्थिती होती.
-------------------------
रांजणगावात गतिरोधकाची दुरवस्था
वाळूज महानगर : रांजणगावात मुख्य रस्त्यावर टाकलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावे, यासाठी ग्रामपंचायतीने गावातून जोगेश्वरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक उभारले आहे. आजघडीला रस्त्यावर खड्डेही पडले असल्याने वाहनधारकांना कसरत करीतच ये-जा करावी लागत आहे.
----------------------------