औसा : मुलींची संख्या घटत असल्याने त्यावर चिंता व्यक्त करीत औसा तालुक्यातील उटी बु़ येथील ग्रामपंचायतीने वर्षभराच्या कालावधीत जन्मलेल्या मुलीच्या नावे पाच हजार रूपयांची बचत ठेवण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे़ मुलगा-मुलगी एकसमान असा नारा देण्यात येत असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनामध्ये अद्याप ही भावना रूजली नाही़ त्यामुळे मुलगा-मुलगी यांच्या संख्येतील अंतर कायम राहत आहे़ शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवून हा दुरावा दूर करण्याचा आणि मुलींची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ शासनाच्या या उपक्रमास आणखी बळ मिळावे म्हणून औसा तालुक्यातील उटी बु़ येथील ग्रामपंचायतीने कन्या प्रोत्साहन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे़ उटी बु़ हे केवळ २ हजार लोकसंख्येचे गाव आहे़ गावातील निरक्षर नागरिकांत मुलगा-मुलगी समान असल्याची भावना रूजावी़ तसेच स्व़ विलासराव देशमुख यांच्या स्मृति आठवणीत रहाव्यात म्हणून विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून ही योजना सुरु केली आहे़ येत्या १५ आॅगस्ट २०१५ पर्यंत गावात जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे ५ हजार रूपयांची बचत करण्यात येणार आहे़ ही रक्कम सदरील मुलगी उपवर झाल्यानंतर तिला मिळणार आहे़ त्यामुळे या योजनेला स्व़ विलासराव देशमुख कन्या प्रोत्साहन योजना नाव देण्यात आले आहे़ या नाविण्यपूर्ण योजनेचे गावकऱ्यांतून स्वागत होत असल्याने मुला-मुलींतील दरी कमी होण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर) ग्रामीण भागातील नागरिकांत मुलीबद्दल आजही अनास्था असल्याचे दिसून येते़ त्यामुळे मुलगी ही परक्याचे धन असल्याचे चर्चिले जाते़ ही मानसिकता दूर व्हावी म्हणून आपण ग्रामपंचायतीच्या वतीने कन्या प्रोत्साहन योजना राबविण्यास सुरुवात केल्याचे सरपंच अॅड़ भालचंद्र पाटील यांनी सांगितले़ विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी या योजनेस उत्स्फूर्तपणे पाठींबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले़
उटी ग्रामपंचायतचे ‘कन्या’ प्रोत्साहन
By admin | Updated: August 24, 2014 00:20 IST