हिंगोली : तलाठ्यांच्या गावभेटीसंदर्भातील कळमनुरी तालुक्याचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, औंढा नागनाथ येथील तहसीलदार मात्र अद्यापही साखरझोपेतच असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्यातील तलाठ्यांनी त्यांचा सज्जा अंतर्गतयेणाऱ्या गावांच्या भेटीचे निश्चित असे वेळापत्रक तयार करावे. जेणेकरून शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी शहरात चकरा मारण्याची गरज लागू नये, या उद्देशाने ‘लोकमत’ ने याचा पाठपुरावा चालविला आहे. २५ जून रोजी ‘लोकमत’ ने जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये बहुतांश तलाठी हे महिनोमहिने सज्जाच्या ठिकाणी न जाता शहराच्या ठिकाणाहूनच कारभार पाहत असल्याचे स्पष्ट झाले होते. कामचुकार तलाठ्यांचे पितळ उघडे पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच तलाठ्यांनी त्यांचे गाव भेटीचे वेळापत्रक तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असे आदेश तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत २७ जून रोजी दिले होते. असे असले तरी ३ जुलैपर्यंत एकाही तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नव्हती. याबाबतचे वृत्त पुन्हा ४ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच हिंगोली, सेनगाव, वसमत येथील तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील तलाठ्यांचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले. कळमनुरी तहसीलदारांनीही ४ रोजीच यासंदर्भातील मेल जिल्हाकचेरीस केला होता; परंतु याबाबत तांत्रिक चूक झाल्याने तो ५ रोजी आस्थापना विभागास मिळाला; परंतु औंढा नागनाथ येथील तहसीलदार मात्र अद्यापही साखरझोेपेतच आहेत. चार तालुक्यांचे वेळापत्रक आले तरी येथील तहसीलदार मदनूरकर यांनी वेळापत्रक पाठविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी त्यांच्यासंदर्भात आता काय भूमिका घेतात? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कळमनुरी तालुक्याचेही वेळापत्रक मिळाले
By admin | Updated: July 6, 2014 00:16 IST