औरंगाबाद : सासू-सुनेचे नाते अनेक पदरांनी नटलेले असते. सासूची प्रतिमा कजाग अशी दाखविली जात असली तरी सासू कधी आई असते तर कधी बहिणीसारखी साथ देणारी असते. नव्या जमान्यात तर आई-मुलीसारखे नाते असणाऱ्या सासू- सुनेच्या जोड्याही पाहायला मिळतात. याच सगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखविणारा लोकमत सखी मंच आणि कलर्स प्रस्तुत ‘जोडी नं. १ : सासू-सून’ हा कार्यक्रम २१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. लोकमत भवन, औरंगाबाद येथे रंगणार आहे. जीवनाचे अनेक रंग दाखविणारे कौटुंबिक चॅनल कलर्स आणि स्त्रियांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देणारे ‘लोकमत सखी मंच’ खास आपल्यासाठी ही मेजवानी घेऊन येत आहे. नात्यातील अनेक रंगांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडविणारा ‘जोडी नं. १ : सासू- सून’ हा कार्यक्रम म्हणजे सासू-सुनांच्या नात्यातील दुवा ठरेल किंवा त्यांच्या नात्याला खमंग फोडणी देणारा ठरेल. विचारांची जुगलबंदी, नात्याची वीण, संसारातील तडजोड, परस्पर सामंजस्य यावर या कार्यक्रमाची संपूर्ण आखणी राहणार असून नाट्य, मनोरंजन, मिश्कीलता, कोपरखळ्या अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल. कलर्स चॅनलवरच्या अनेक सासू-सुना जोड्या सर्वपरिचित आहेत. यामधील ‘ससुराल सिमरन का’ मधील सून सिमरन व सासू सुजाता या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. आपल्या कुटुंबासाठी एका सुनेने केलेला त्याग, तिचे प्रेम, तिची जबाबदारी आणि कर्तव्ये याची सुरेख सांगड यामध्ये दाखविली आहे. तर तिच्या संघर्षात तिच्या सासरचा आणि सासूचा भक्कम पाठिंबा हासुद्धा तेवढाच महत्त्वाचा दाखविण्यात आला आहे. ‘मेरी आशिकी तुमसे है’ मधील इशानी आणि सासू अंबा यांच्या नात्यातील विविध कंगोरे, बा आणि त्यांच्या सुनांचे नाते या मालिके त अतिशय ताकदीने मांडले गेले आहे. अशाच प्रकारच्या अनेक सासू-सुनांच्या जोड्या कलर्सवर वेगवेगळ्या मालिकांमधून रसिक चाहत्यांना भेटत असतात. आता वेळ आली आहे आपल्या अवतीभवती असणाऱ्या सासू-सुनांमधील नात्यांची जुगलबंदी अनुभवण्याची. स्पर्धेसाठी बिनधास्त बोल फेरी, सादरीकरण फेरी, प्रश्न-उत्तर फेरी, परफेक्ट मॅचिंग, अशा चार फेऱ्या असणार आहेत. पहिल्या फेरीत सामायिक चर्चासत्र होईल. यामध्ये १ मिनिटात सासू- सुनांना एकमेकींची ओळख करून द्यावी लागेल. बाकी तीन फेऱ्यांना ठराविक वेळ दिला जाईल. दुसऱ्या फे रीमध्ये सासू- सून मिळून गाणे, डान्स, नक्कल किंवा अभिनय काहीही सादर करू शकतात. मॅचिंग फेरीत ज्वेलरी, कपडे आणि वैचारिक प्रसंगावधान तपासले जाईल. त्यानंतर चौथी फेरी परीक्षक फेरी असेल. यात परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सासू-सुनेला द्यावी लागतील. ही फेरी लेखी किं वा तोंडी स्वरूपात असेल. ही स्पर्धा नि:शुल्क असून, जास्तीत जास्त सासू-सुनांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. दि. २१ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच नोंदणी करता येईल. ऐनवेळेवर कोणालाही नावनोंदणी करता येणार नाही. नोंदणीसाठी फॉर्म लोकमत कार्यालयात येऊन भरणे आवश्यक आहे. नावनोंदणी केलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेच्या अर्धा तास अगोदर कार्यक्रमस्थळी हजर राहावे. प्रवेश लोकमत भवनच्या मागील गेटने देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रकाश भागवत व स्नेहल कदम यांचा कॉमेडी धमाका हास्यसम्राट व फुबाई फू फेम प्रकाश भागवत व स्नेहल कदम (सिने- नाट्य अभिनेत्री) यांचा कॉमेडी धमाकादेखील यावेळी होणार आहे. स्पर्धा, सासू-सुनांची सोबत आणि हास्याचा प्रचंड खळखळाट अनुभवण्याची अनोखी संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
‘जोडी नं. १ : सासू - सून’ सासू - सुनांची रंगणार जुगलबंदी
By admin | Updated: December 20, 2015 23:55 IST