लातूर : नर्सिंग रुग्णालय, सोनोग्राफी केंद्र, एमटीपी सेंटरमधील कार्यपद्धती व सुविधांच्या तपासणीसाठी आरोग्य, महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकामार्फत धडक मोहीम सुरू आहे़ या मोहिमेत आतापर्यंत लातूर जिल्ह्यात १५० पैकी १३ सोनोग्राफी केंद्र, १२१ एमटीपी सेंटरपैकी ९४ आणि ३२१ नर्सिंग रुग्णालयांपैकी १२१ रुग्णालयाची तपासणी करण्यात आली असून, त्या तपासणीचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सादर करण्यात आला आहे़ शासनाच्या नियमानुसार नर्सिंग रुग्णालयात सुविधा व कार्यपद्धती आहे का? याची तपासणी केली जात आहे़ एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण कसे आहे, नियम व अटींच्या आधीन राहून गर्भपात केले जातात का? याची तपासणी तसेच सोनोग्राफी केंद्रामध्ये कायद्याचे पालन करून सोनोग्राफी केली जाती का? या बाबींची तपासणी या पथकामार्फत करण्यात येत आहे़ लातूर जिल्ह्यात एकूण २३ पथके स्थापन करण्यात आली असून, आतापर्यंत १५० सोनोग्राफीपैकी ११३ केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे़ तर १२१ गर्भपात केंद्रांपैकी ९४ केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे़ ३२१ नर्सिंग रुग्णालयांपैकी १२१ रुग्णालयांची या पथकांनी तपासणी केली असून, त्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सादर करण्यात आला आहे़ १४ एप्रिलपर्यंत या पथकामार्फत तपासणी सुरू राहणार आहे़ म्हैसाळ येथे १९ मृत अर्भकाचे अवशेष सापडल्याने ही धडक मोहीम शासनाने हाती घेतली आहे़ पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत ही तपासणी करण्यात येत आहे़
लातूर जिल्ह्यात धडक मोहिमेत ३२८ रुग्णालयांची झाडाझडती
By admin | Updated: April 6, 2017 23:24 IST