येलदरी : जिंतूरहून सेनगावकडे जाणाऱ्या जीपला येलदरीजवळ अपघात झाल्याने १७ प्रवासी जखमी झाले़ ही घटना २३ आॅगस्ट रोजी सायंकाळी घडली़ जखमींना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले मात्र या ठिकाणी एकही डॉक्टर हजर नसल्याने काही जखमींना खाजगी रुग्णालयात नेऊन उपचार करावे लागले़ जिंतूर-येलदरी-सेनगाव या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक चालते़ २३ आॅगस्ट रोजी अवैध वाहतूक करणारी जीप (एमएच २२ सी-१३३) जिंतूरहून सेनगावकडे जात होतीे़ १७ ते २० प्रवासी या जीपमधून प्रवास करीत होते़ अचानक ही जीप उलटल्याने माणिक पांडे, रेखा पांडे, अमृता पांडे (रा़ वरुड चक्रपान), श्रीकांत देशमुख, अनिता देशमुख (रा़हाताळा), मदन पवार, संगीता पवार (रा़ हाताळा तांडा), रमेश जाधव, इंदू जाधव (रा़ लिंबाळा), वसंत राठोड (रा़ गणेशनगर तांडा) हे प्रवासी जखमी झाले़ यातील काही जखमी परस्पर खाजगी वाहनांमधून उपचारासाठी निघून गेले़ भर रस्त्यात अचानक अपघात झाल्याने नागरिक मदतीला धावले़ नागरिकांनी जखमींना येलदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले़ परंतु, या ठिकाणचे दोन्ही डॉक्टर उपस्थित नव्हते़ त्यामुळे जखमींचे हाल झाले़ जेव्हा जेव्हा अपघात होतो, तेव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसतात, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे़ विशेष म्हणजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाचा सन्मान मिळालेला आहे़ (वार्ताहर)
जीपला अपघात १७ प्रवासी जखमी
By admin | Updated: August 24, 2014 00:32 IST