उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील श्री जयलक्ष्मी शुगर या कारखान्याकडून अनेक ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ची कारवाई केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जमीन जप्त करून मंगळवारी संबंधित स्पॉटवर लिलाव ठेवला होता. परंतु, बोली लावण्यासाठी कोणीच फिरकले नाही. त्यामुळे आता फेरलिलाव काढण्यात येणार आहे.उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथे श्री जयलक्ष्मी शुगर प्रॉडक्ट प्रा. लि. हा कारखाना आहे. या कारखान्यासाठी तुळजापूर, उस्मानाबादसह औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस घातला होता. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्यांचे हक्काचे पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनासह साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ची कारवाई करून अंमलबजावणीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून संबंधित कारखान्याला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या. परंतु, शेतकऱ्यांचे ७ कोटी ६९ लाख रूपये दिले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जमिनी जप्तीचे आदेश काढले होते. त्यानुसार २० आॅगस्ट २०१५ रोजी उपरोक्त रक्कमेच्या वसुलीसाठी जवळपास वेगवेगळ्या बारा गटांतील मिळून शंभर एकराच्या आसपास क्षेत्र जप्त करून शासन नावे जमा केले. दरम्यान, जप्तीची प्रक्रिया झाल्यानंतर लागलीच प्रशासनाकडून लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार जनजागृतीही करून २२ मार्च रोजी संबंधित स्पॉटवर लिलाव ठेवला होता. परंतु, बोली बोलण्यासाठी कोणीही आले नाही. त्यामुळे संबंधित शंभर एकरावर क्षेत्राचा लिलाव होवू शकला नाही. त्यामुळे लवकरच फेरलिलाव काढला जाणार आहे. लिलावासाठी उस्मानाबाद तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश जाधव, मंडळ अधिकारी चौरे, फुलचंद बेरड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘जयलक्ष्मी’च्या जमिनीसाठी बोली लागलीच नाही !
By admin | Updated: March 23, 2016 01:05 IST