लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़ त्यामुळे जार वॉटरची विक्री जोमातच आहे़ ‘लोकमत’ने आरोग्याशी हानीकारक असणार्या या पाण्यासंदर्भात स्टिंग आॅपरेशनद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले़ मात्र अन्न व औषधी प्रशासनाचा वेळकाढूपणा जार वॉटर विक्रीला पोषक ठरत आहे़ लातूर जिल्ह्यात अनाधिकृतपणे जार वॉटरची विक्री करणारे जवळपास ३६ ते ४२ प्लांटधारक आहेत़ त्यांच्याकडे ना अन्न व औषधी विभागाचा परवाना ना स्थानिक संस्थेचा़ बीएसआय मानांकन तर दूरच़ शिवाय, पाण्याची कसलीही चाचणी न करता, शुद्धीकरण न करता, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न करता विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ची मालिका सुरू झाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगून हात झटकले होते़ मात्र जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी पाण्याची कसलीही चाचणी न करता विक्री होत असेल आणि त्यांच्याकडे परवाना नसेल तर हा व्यवसाय अनाधिकृत व धोकादायक असल्याचे सांगून कारवाई करण्याचे लेखी आदेश अन्न व औषधी प्रशासनाला दिले होते़ त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने उदगीर शहरात ७ व लातूर शहरातील २ प्लांटधारकांची तपासणी केली़ या तपासणीनंतर कसलीही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाने केली नाही़ अन्न व औषधी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भात विचारले असता ते कधी औरंगाबादला कार्यशाळा तर कधी मुंबईला मिटींग असल्याचे सांगून वेळकाढूचे धोरण अवलंबत आहेत़ अन्न व औषधी निरिक्षक कारवाई चालू असल्याचे सांगत आहेत़ नेमके कारवाईचे गोडबंगाल अन्न व औषधी प्रशासनाकडून समजत नाहीत़ त्यामुळे आजही लातूर शहर व जिल्ह्यात जारद्वारे पाण्याची खुलेआम विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ने या विषयावर प्रबोधन केल्यामुळे जनतेमध्ये जनजागृती झाली आहे़ त्यामुळे जार पाण्याची विक्री थंडावली आहे़ परंतु, प्लांटधारकाचा हा व्यवसाय सुरूच आहे़ केवळ अन्न व औषधी प्रशासनाचे या व्यवसाय धारकांना अभय मिळत असल्याने हा प्रकार चालू आहे़ (प्रतिनिधी) प्रशासन गप्प पाण्याचे शुद्धीकरण करून पॅकबंद पाण्याची विक्री करण्यासाठी किमान २२ चाचण्या घ्याव्या लागतात़ सुक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या पदवीधारक त्या प्लांटमध्ये केमिस्ट म्हणून कार्यरत असायला हवेत़ जलशुद्धीकरण केल्यानंतर पॅकबंद पाणी करून विक्री करण्यास कोणाचीही हरकत नाही़ परंतु, शुद्धीकरणही नाही आणि चाचण्याही नाहीत़
‘जार’ वॉटरच्या कारवाईला आली मरगळ
By admin | Updated: May 14, 2014 01:06 IST