हिंगोली : दारावर भिक्षा मागण्यासाठी आलेल्या अनोळखी महाराजाच्या सांगण्यावरून हिंगोलीतील बाप-लेकाने घरातील गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठीच त्यांनी पशुबळी व नरबळी देण्याची योजना आखली होती, असे पोलिस सुत्रांनी सांगितले. हिंगोली शहरातील अमोलचंद कंदी यांचे किराणा दुकान आहे. दहा वर्षापुर्वी त्यांनी मंगळवारा भागात घर विकत घेतले होते, तेव्हापासून ते तिथेच वास्तव्यास आहेत. काही दिवसांपुर्वी अमोलचंद घरामध्ये जेवण करीत असताना एक महाराज भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या दारावर आला होता. महाराजास १ रूपया देण्याचे अमोलचंद कंदी याने पत्नीला सांगितले. त्यावर आशिर्वाद देत महाराजाने ‘भगवान तुम्हारा भला करे, तुम्हारे घर मे धन है’ असे सांगितले होते. दरम्यान, घरातील लग्नकार्य व व्यवसायातील चढ-उतारामुळे अमोलचंद बेचैन होते. खटकाळी भागात दुचाकीचे पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीचे त्याच्या दुकानावर नेहमी तंबाखू नेण्यासाठी येणे-जाणे होते. एकेदिवशी त्याच्याकडे विषय काढून कंदी याने ‘माझ्या घरात गुप्तधन असल्याचे एका महाराजाने सांगितले आहे’ असे म्हणताच त्या व्यक्तीने ‘गुप्तधन शोधून देणाऱ्यांशी माझी ओळख आहे’ असे सांगितले. त्यानुसार परभणीचा मांत्रिक शेख खदीर शेख मिया (४५) यास बोलावण्यात आले. त्याच्यासोबत गुप्तधन शोधून देणारे पुसेगाव येथील शेख मुसा शेख शरीफ, राहोली बु. येथील शेख मिनाज शेख बशीर व शेख रियाज शेख अलाउद्दीन, हे देखील होते. शिवाय गुप्तधनाची जागा निश्चित करण्यासाठी फरजानबी शेख हयात हिला बोलावण्यात आले होते. २९ जून रोजी ११ वाजण्याच्या सुमारास ही मंडळींनी अमोलचंद कंदी यांच्या घराच्या पाठीमागील खोलीत गुप्तधन शोधण्यासाठी मंत्रोच्चार करून जागा निश्चित केली. त्यानंतर रात्री १२ वाजता खोदकामास सुरूवात झाली. त्या खोलीत चार कोपऱ्यावर चार लिंबू, नवीन टॉवेल, साडी, रूमाल, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का, लाल मिरच्या आदी पुजेचे साहित्य ठेवण्यात आले होते. तब्बल दोन तास खोदकाम करूनही काहीच न सापडल्याने ही मंडळी थकून गेली आणि दुसऱ्या दिवशी उर्वरित खोदकाम करण्याचे ठरले. त्याप्रमाणे ३० जूनच्या मध्यरात्री १२ वाजता पुन्हा त्याच जागेवर खोदकामास सुरूवात झाली. दरम्यान, पोलिसांना याची खबर मिळाली आणि सर्व आरोपी हाती लागले. खोदकामादरम्यान गुप्तधन न सापडल्यास पशुबळी व प्रसंगी नरबळी देण्याचीही या मंडळींची तयारी होती, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिल्हाभरात चर्चेचा विषय झालाकाही दिवसांपुर्वी भिक्षा मागण्यासाठी आलेल्या महाराजांनी घरामध्ये धन असल्याचे सांगितले होते आरोपींला.व्यावसायातील चढ-उतारामुळे बेचेन झाला होता आरोपी.यासाठीच गुप्तधनाचा शोधपरभणी येथील मांत्रिकाला बोलावून गुप्तधन शोधण्याचा खटाटोपगुप्तधनाची जागा निश्चित करण्यासाठी बोलाविले नर्सी येथील महिलेला.आरोपींचा डाव पोलिसांनी पाडला हाणून.
महाराजाच्या सांगण्यावरून सुरू झाला गुप्तधनाचा शोध
By admin | Updated: July 4, 2014 00:20 IST