औरंगाबाद : औरंगपुरा जि.प. मैदानावर शनिवारी आगीत भस्मसात झालेल्या फटाका बाजाराला कोणी आग लावली अथवा नैसर्गिकरीत्या लागली, यादृष्टीने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. या अग्निकांडात कोणालाही इजा पोहोचली नसली तरी या घटनेत बारा कोटींची मालमत्ता जळून खाक झाली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, औरंगपुरा येथील फटाका बाजार शनिवारी आगीत जळून खाक झाला. या घटनेप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात अकस्मात जळीत घटना अशी प्राथमिक नोंद करून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. तपासाचे आदेश प्राप्त होताच पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवारी सायंकाळीच तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनेच्या २४ तास आधी येथे कोणतीही दुर्घटना होणार नाही, अशी ग्वाही देणाऱ्या या बाजाराला अचानक आग लागते आणि अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण बाजार जळून खाक झाला. आगीचा केंद्रबिंदू म्हणून ज्या दुकानदारांवर संशय आहे. ते दुकानदार अद्यापही पोलिसांसमोर आलेले नाहीत. यामुळे त्यांचा जबाब या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा घातपाताचा तर प्रकार नव्हे ना, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आग लागली की लावली
By admin | Updated: October 31, 2016 00:46 IST