लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गणेश विसर्जन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन चार दिवसांपूर्वी शहरातील शिवाजी चौकात शिवसेनेचे खा.बंडू जाधव व आ.डॉ.राहुल पाटील यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतील वाद शुक्रवारी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मिटल्याचे सांगण्यात आले.गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ५ सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवरुन शिवसेनेचे खा.बंडू जाधव व आ.डॉ.राहुल पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती.आतापर्यंत पडद्यामागे दिसून येणारी गटबाजी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी पहावयास मिळाल्याने शिवसैनिकांसह गणेशभक्तही स्तंभित झाले होते. याबाबतची माहिती मातोश्रीवर पोहचल्यानंतर खा.जाधव व आ. पाटील यांना मातोश्रीवरुन बोलावणे आले. त्यानुसार हे दोन्ही पदाधिकारी शुक्रवारी मातोश्रीवर दाखल झाले. पर्यावरणमंत्री रामदास कदम व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष मिटवला.यापुढे असे मतभेद होणार नाहीत, असे वचन त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले असल्याचे समजते. शिवसेनाभवन येथे रामदास कदम यांनी बंडू जाधव व राहुल पाटील यांना साखर भरवून हा वाद मिटल्याचे जाहीर केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसैनिकांनी आता सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
खासदार- आमदारांतील वाद मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:40 IST