खुलताबाद : गावातील विवाहित महिलेला पळवून घेऊन जाणाऱ्या विवाहित तरुणाला महिलेच्या नातेवाईकांनी नग्न करीत बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना २ जुलै रोजी तालुक्यातील तीसगाव तांडा येथे घडली असून, खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
तालुक्यातील तीसगाव तांडा येथील किशोर साहेबराव चव्हाण (३५) हा ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतो. त्याला एक मुलगी व दोन मुलगे आहेत. दरम्यान, त्याचे गावातील तीस वर्षीय विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले. सहा महिन्यांपूर्वी दोघांनी पळून जाऊन संसार थाटला. अगोदर बारामती परिसरात काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ते काही दिवसांपूर्वी कन्नड येथे राहायला आले. शुक्रवारी २ जुलै रोजी किशोर हा तीसगाव तांडा गावात गेला. दारू पिवून गावातील लोकांसमोर हिरोगिरी करत वेडेवाकडे बोलत असताना त्या विवाहितेच्या नातेवाईकांनी त्याला नग्न करून चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
---
खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद
पळून गेलेल्या तीस वर्षीय विवाहित महिलेच्या पतीने १ फेब्रुवारी रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती, तर गावातील लोकांनी २ जुलै रोजी मारहाण केल्याची तक्रार किशोर चव्हाण याने खुलताबाद पोलीस ठाण्यात दिली आहे. चार जणांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी सांगितले.