औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील क्रिकेटपटूंची गरवारे क्रीडा संकुलात नवीन रूपडे लाभलेल्या व हिरवा गालिचा असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानावर खेळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवीन क्रिकेट मैदानाचा शनिवारी, दि.२५ नोव्हेंबर रोजी लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना आज दिली.गरवारे क्रीडा संकुलातील नूतनीकरण झालेल्या क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी ९ वाजता खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी विशेष उपस्थिती ही आ. अतुल सावे यांची असणार आहे, तर अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले असणार आहेत. याप्रसंगी उपमहापौर, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, मनपा सभापती, विरोधी पक्षनेते आदींची उपस्थिती असणार आहे.तत्पूर्वी, आज या मैदानाची महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाहणी केली. यावेळी माजी महापौर भगवान घडमोडे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, सचिव सचिन मुळे, नगरसेवक शिवाजी दांडगे, संगीता सानप, गोकुळसिंग मलके, राजू शिंदे, जया गुदगे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त रवींद्र निकम, वसंत निकम, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, मनपाचे क्रीडा अधिकारी संजीव बालय्या आदी उपस्थित होते.मैदानाची पाहणी करताना हे मैदान आठवड्यातून दोन दिवस खेळण्यासाठी वापरण्यात येऊ नये, मैदानावर टेिनस बॉलच्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात येऊ नयेत, मैदान भाड्याने देण्यासाठी दरनिश्चिती करावी, समिती स्थापन करावी आदी सूचना राम भोगले, सचिन मुळे यांनी केल्या. महापौर नंदकुमार घोडेले यांनी या सूचनांची तात्काळ दखल घेऊन तसे आदेश प्रशासनाला दिले. तसेच मैदानाची देखभाल व दुरुस्ती करण्याची निविदा तात्काळ काढण्यात येईल. मैदानाच्या इतर दुरुस्तीची कामे करण्यासाठी अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली असून, लवकरच ही कामे सुरू केली जातील. बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्टच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, समिती गठीत करण्यासाठी २ क्रिकेट संघटनांचे प्रतिनिधी, १ गरवारे यांचा प्रतिनिधी आणि मनपाच्या प्रतिनिधींची नियुक्ती आदींचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जातील. सभेच्या मंजुरीस अधीन राहून दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गरवारे क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा शनिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:22 IST