लातूर : अपघातग्रस्त कारचे पैसे देण्यासाठी नकार दिल्यानंतर वाहनाच्या मालकाने ग्राहक तक्रार मंचात धाव घेतली असता विमा कंपनीने ग्राहकाला ३४ हजार ५४५ रुपये महिनाभरात द्यावेत तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये तर दाव्याच्या खर्चापोटी ३ हजार रुपये द्यावेत, असा निकाल दिला आहे. लातूरच्या बार्शी रोडवरील अमर हॉटेलच्या पाठीमागे राहणारे दिलीप रंगनाथराव नलवाड यांनी घरगुती कामासाठी जीप खरेदी केली होती. त्यांनी या जीपचा विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. शाखाधिकाऱ्यांकडे विमा उतरविला होता. विमा कंपनीचे कार्यालय लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कसमोर प्रभा आर्केडच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. १४ मे २०१२ ते १३ मे २०१३ या एक वर्षाच्या कालावधीत विम्याची जोखीम होती. दरम्यान, जीप मालक दिलीप नलवाड (वय ४९) हे व्यंकटेश शाळेसमोर गाडी पार्किंग करून कामकाज पाहत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. या गाडीच्या नुकसानीचे काम राजीव गांधी चौकातील एका गॅरेजमध्ये पूर्ण झाल्यावर गाडी दुरुस्तीची ६३ हजार २७९ रुपयांची खर्चाची बिले सादर केली. विमा कंपनीचे सर्व्हेअर अभिजीत नलावडे म्हणाले, तुम्ही १५ हजार रुपये मला द्या, आम्ही जो रिपोर्ट देऊ, त्याचाच कंपनी जास्त विचार करून क्लेम मंजूर करते, असे सांगितले. सर्व्हेअरला पैसे न दिल्यामुळे त्याने अर्जदारास गोड बोलून दुसरा क्लेम फॉर्म भरून घेतला. सोलापूर व मुंबई येथील विमा कंपनीच्या मुख्य शाखेकडे विचारणा केली असता जीप मालकास ६३ हजार २७९ रुपये न देता केवळ १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. अर्जदाराकडून अॅड. बी.बी. बोंबिलवाड यांनी काम पाहिले.
विमा कंपनीने ३४ हजार रुपये देण्याचे आदेश
By admin | Updated: May 18, 2015 00:20 IST