उस्मानाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी भूजल उपलब्धता प्रमाणपत्र देण्यासाठी चारशे रुपयांची लाच घेताना येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अनिल दौलतराव सोळंके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. याबाबत एसीबी कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदाराची खासापुरी (ता. परंडा) येथे शेती आहे. सदर शेतजमिनीत मग्रारोहयो अंतर्गत नवीन विहीर मंजूर होण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी त्यांना भूजल उपलब्धता प्रमाणपत्राची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला होता. यानंतर त्यांनी या कार्यालयातील भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अनिल सोळंके यास भेटून प्रमाणपत्र लवकर देण्याची विनंती केली. यावर सोळंके याने सदर प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच हे पैसे दिल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहून लेखी तक्रार दाखल केली.या तक्रारीवरून पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सोमवारी या कार्यालयात सापळा रचला. यावेळी अनिल सोळंके यास तक्रारदाराकडून तडजोडीअंती चारशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक असिफ शेख करीत आहेत. (प्रतिनिधी)
माहिती प्रणाली सहाय्यक जेरबंद
By admin | Updated: May 19, 2015 00:47 IST