जालना : महावितरणकडून अॅप सुरू केल्यानंतर ग्राहकांना मोबाईल कंपन्यांच्या धरतीवर वीज बिल, खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी तसेच बिल भरण्याची अंतिम तारीख आदींची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. सोबतच ई-मेलवरही माहिती उपलब्ध असणार आहे.महावितरणकडून वीज बिल भरतेवेळी वीज बिलात दिलेल्या जागेमध्ये मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी नमूद केल्यास सदर सेवा वीज ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी महावितरणकडून जनजागृती करण्याचे काम सुरू असून, ग्राहकांनी मोबाईल क्रमांक व ईमेल दिल्यास तात्काळ माहिती उपलब्ध होणार असल्याचे औरंगाबाद परिमंडळाचे अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले. मोबाईल कंपन्या ज्या प्रमाणे सेवा देतात त्याचप्रमाणे महावितरणकडूनही ही सेवा दिला जाणार आहे. यासाठी ग्राहकांचे सहकार्य अपेक्षित असून, वीज बिल भरणा केंद्रातही ही सुविधा उपलब्ध असून, येथेही नागरिक भ्रमणध्वनी व ई-मेल आयडीची नोंद करू शकतात. महावितरणकडून चोवीस तास ग्राहक सुविधा केंद्र सुरू आहे. महावितरणने सुरू केलेल्या अॅपलाही चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील दहा हजारपेक्षा अधिक ग्रहाकांकडून या अॅपचा वापर सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. ग्राहकांनी योग्य माहिती दिल्यास काही दिवसांतच वीज बिलांची माहिती मोबाईलवर मिळणे सुलभ होणार आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी सर्व माहिती वीज बिलात नमूद करावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता बी.टी.जाधव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
वीजबिलाची माहिती आता एसएमएसवर
By admin | Updated: December 31, 2016 00:21 IST