नांदेड : यंदा दुबार पेरणी आणि आता सोयाबीनवर उंटअळीचा तर कापसावर रसशोषण करणाऱ्या कीडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. किडी व अळींचा नायनाट करण्यासाठी किटकनाशकांची तर काही पेट्रोलची फवारणी करीत असल्याचेही चित्र जिल्ह्यात आहे. खरीप हंगामात एकूण क्षेत्रापैकी २ लाख ६८ हजार ७०० हेक्टरवर कापसाची लागवड तर २ लाख ३१८०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर कापूस व सोयाबीनचे पीक डोलत आहे. तर तूर ५४ हजार ६०० हेक्टर, उडिद १८ हजार ९०० हेक्टर, मूग १७ हजार ५०० हेक्टर, ज्वारी ५१ हजार ५०० हेक्टर व इतर पीके आहेत. जिल्ह्यातील नांदेड कृषी उपविभागातील नांदेड, मुदखेड, कंधार व लोहा या चार तालुक्यात सोयाबीन व कापूस पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पातंर्गत काम सुरु आहे. सर्वेक्षणामध्ये कपाशीवरील रस शोषण करणारी किडी व सोयाबीन उंट अळी, स्पोडोप्टेरा या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कीडीवर वेळीच नियंत्रण न मिळाल्यास उत्पादनावर परिणाम होणार आहे. बहुतांश भागात कापसावर कीडीचा तर सोयाबीनवर अळीचाा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. त्यावर नियत्रंण कसे मिळवावे, यासाठी ेकृषी विभाग तसेच संबधीत विभागाचा सल्ला महत्वाचा आहे.(प्रतिनिधी) कृषी विभागाचा सल्लाउंटअळी, स्पोडोप्टेरा व हेलीकोव्हर्पा अळीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के २ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. चक्री भुंग्याच्या व्यवस्थापनासाठी ट्रायझोफॉस ४० टक्के १.६ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. वातावरणातील आद्रता ७५ टक्यापेक्षा जास्त असेल तर बीव्हेरीया बासीयानाची फवारणी करावी. स्पोडोप्टेराच्या अन्डीपुंजा व समुहातील अळ््यावर लक्ष्य ठेवावे. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा़
सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 20, 2014 00:05 IST