लोकमत न्यूज नेटवर्कबीड :जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील ४९५ ठिकाणच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यातील तब्बल ९४ गावातील पाणी नमुने अतिदुषित, तर ११० ठिकाणचे पाणी नमुने दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे.पावसाळ्यात जलजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणच्या सार्वजनिक जलस्त्रोतातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील ४९५ ठिकाणच्या जलस्त्रोतांच्या पाण्याचे नमुने यावेळी घेण्यात आले. यानंतर सदर पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील तब्बल ११० ठिकाणचे पाणी नमुने म्हणजेच तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी २२ टक्के नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. दूषित ११० नमुन्यांपैकी ९४ ठिकाणचे पाणी अतिदूषित असल्याचेही अहवालात नमूद आहे. यातही बीड व गेवराई तालुक्यातील पाणी नमुने जास्त प्रमाणात दुषीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तालुक्यांमधील गावे नदी पात्रालगत असल्याने तेथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही नदीलगत आहेत. त्यामुळे सदर ठिकाणचे पाणी नमुने जास्त प्रमाणात दुषीत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे.
गावांत दूषित पाणी; आरोग्य धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:28 IST