सिल्लोड : ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न ५६ हजारांवर आहे. ज्यांच्याकडे चार चाकी, दुचाकी वाहन आहे, असे लोक बीपीएल योजने अंतर्गत धान्य घेण्यास अपात्र ठरविले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने ही मोहीम स्वस्त धान्य दुकानदार मार्फत राबविण्याचा निर्णय घेतला. ही अपात्र शिधापत्रिका मोहीम तालुकास्तरावर समिती गठीत करून राबवावी, अशी मागणी
तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देण्याच्या प्रसंगी तालुकाध्यक्ष रफिक शेरखान, उपाध्यक्ष राधेश्याम कुलवाल, मधुकर बरडे, जनार्दन शेजुळ, अजीज पठाण, कौतीक गवळी, नारायण काकडे, अफसर पठाण, सचिव पंडीत पारधे, मीनाक्षी जितेंद्र माहोर, सलीम बागवान, भगवान काथार, संजय पाटील, ठकुबा काकडे, शे.रब्बानी, पंडीत गोडसे यांची उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की, ही मोहीम राबवितांना स्वतंत्ररित्या जी समिती गठीत केली आहे, त्याऐवजी तालुकास्तरावरच समिती गठीत करून शहरी भागात नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या अधिनस्त वार्डनिहाय कर्मचाऱ्यांकडून सदर फॉर्मची छाननी करण्यात यावी. तसेच फॉर्म भरून घेण्यात यावेत. तर ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी यांची मदत घेऊन ही मोहीम राबविण्यात यावी.
----------------
फोटो कॅप्शन : विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम राजपूत यांना देताना स्वस्त धान्य विक्रेता संघटनेचे पदाधिकारी.