औरंगाबाद : जायकवाडी जलाशयात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व अहमदनगरनजीकच्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे १५ टक्के पाणी कपात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी जुलै महिन्यात १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी घेतला होता. ती कपात आजवर कायम राहिली. गेल्यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाले नाही. त्यामुळे या वर्षी जायकवाडीत पाणीसाठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला नाही. या वर्षीचा उन्हाळा कडक असल्याने जून अखेरपर्यंत उद्योगांचे पाणीकपात निर्णय होण्याची शक्यता जिल्हा प्रशासन सूत्रांनी वर्तविली. जायकवाडीतील जिवंत जलसाठा संपला आहे. मृतसाठ्यातून उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा उपसा सुरू होणार आहे. जायकवाडी धरणात अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना आहेत. शिवाय दोन लाख शेतकरीदेखील अवलंबून आहेत.