दगडू सोमाणी, गंगाखेडशासनाने तालुका पातळीवर उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळावे, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी औद्योगिक वसाहती निर्माण केल्या. मात्र गंगाखेडच्या औद्योगिक वसाहतीस कायमस्वरुपी रोजगार निर्माण करणारे उद्योगधंदे उभारले नाहीत. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीची वाताहत झाली आहे. गंगाखेड शहरालगत दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कोद्री राज्य रस्त्यावर २० ते २५ वर्षापूर्वी शासनाने ५० एकर जमीन संपादित केली होती. या औद्योगिक वसाहतीत कारखान्याच्या माध्यमातून उद्योगधंदे सुरू व्हावेत, सुशिक्षित बेरोजगार व अप्रशिक्षित कामगारांच्या हाताला काम मिळावे हा हेतू होता. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना व सुशिक्षित तरुणांना छोटे-मोठे उद्योग उभारता यावेत, यासाठी शासनाने त्या काळात सवलतीच्या दरात भूखंड दिले. या औद्योगिक वसाहतीत २० वर्षानंतर म्हणजे मागील चार वर्षापूर्वी घोडावत कंपनीचा कोट्यवधी रुपये गुंतवणूक करून सोयाबीन आॅईल प्लॅन्ट उभारण्यात आला. मात्र हा कारखाना दोन-तीन महिन्यापेक्षा जास्त काळ चालविला जात नाही. या ठिकाणी प्रशिक्षित व अप्रशिक्षित ५०० कामगार हंगामी काम करतात. दोन-तीन महिने चालणारा एकमेव कारखाना या औद्योगिक वसाहतीत आहे. त्यामुळे नऊ महिने कामगारांना इतरत्र काम शोधावे लागते. शेकडो रोजगारांना कायमस्वरुपी काम मिळत नाही. या वसाहतीत उद्योगधंदे वाढीला लागत नाहीत म्हणून वेअर हाऊस, विद्युत मंडळाचे वीज वितरण उपकेंद्र, जिनिंग प्रेसिंग, प्लास्टिकचा उत्पादन करणारा एक छोटा प्रकल्प कार्यान्वित आहे. काही मंडळींनी या औद्योगिक वसाहतीत भूखंड विक्रीच्या माध्यमातून किंमत वाढून मिळेल या आशेने कोणतेही उद्योग धंदे चालू केलेले नाहीत. जिल्ह्यात परभणीनंतर मोठी बाजारपेठ असलेले गंगाखेड शहर असून शासन विविध उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कर्ज व अनुदान स्वरुपाने मदत करीत आहे. आज बरीच तरूण व्यापारी मंडळी व प्रशिक्षण घेतलेले युवक मंडळी उद्योग धंद्याकडे आकर्षित होत आहे. गंगाखेडच्या औद्योगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध नाहीत. ज्यांच्याकडे भूखंड आहेत ते उद्योग धंदे चालू करीत नाहीत. त्यामुळे गंगाखेड शहराच्या औद्योगिकीकरणाला खीळ बसली असून बेरोजगारांना काम धंद्यासाठी मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.हंगामातच चालतो कारखानागंगाखेडच्या औद्योगिक वसाहतीत एकमेव सोयाबीन आॅईलचा कारखाना आहे. परंतु तो हंगामातच चालतो. अन्यथा एकही कारखाना वसाहतीत निर्माण झाला नाही. तालुक्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना व अप्रशिक्षित कामगारांना तसेच उद्योग धंदे चालू करण्यासाठी उत्साहित असलेल्या मंडळींना अन्य शहरांचा आधार घ्यावा लागतो. औद्योगिक वसाहतीतील निम्या पेक्षा अधिक भूखंडावर उद्योग धंदे उभारले नाहीत. त्यामुळे औद्योगिक विकासाची अधोगती झाली आहे.
गंगाखेडमध्ये औद्योगिक वसाहतीची वाताहत
By admin | Updated: August 15, 2014 00:03 IST