औरंगाबाद : जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक, सिडको येथील उड्डाणपुलाची आखणी विकास आराखड्यातील रस्त्याच्या मध्यवर्ती रेषेनुसार जुळणारी असावी. त्यामुळे पुलाला अपरिहार्य (दुसरा काहीही पर्याय नसल्याुमळे) वळण देण्यात आल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता अ. शं. खैरे यांनी लोकमतशी बोलताना केला. तो पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार नाही. तसा काही संशय असेल तर त्रयस्थ संस्थेकडून त्याची उंची आणि उतार याबाबत खात्री करता येईल. प्रत्येकी ३० मीटरला १ फूट अशा पद्धतीने अग्रसेन चौकाच्या दिशेने उतार काढण्यात आलेला आहे, असा दावाही त्यांनी केला. तसेच वसंतराव नाईक यांचा पुतळा हलविण्यासाठी मनपाने मान्यता दिली तरच पुढे जाता येईल. मनपा आणि बांधकाम विभागाच्या जालना रोडसाठी असलेल्या डी. पी. प्लॅनमुळे पुलाचा सेंटर सरकल्यासारखे वाटते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँगे्रसचे आ.सतीश चव्हाण यांनी तो पूल वाहतुकीला खुला करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा, अशी मागणी केली तर भाजपचे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी तो पूल धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली. लोकमतने २७ एप्रिलच्या अंकात ‘सिडको उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरच बदलले’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. त्या पुलाच्या सिव्हिल वर्क नंतरपासून पुढे अर्थवर्कची लांबी पुलाच्या उंचीनुसार ५ ते ६ फुटांनी कमी असल्याच्या काही तक्रारी आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकादायक होण्याची भीती आहे. सिव्हिल वर्कमध्ये कॉलम चुकीचे टाकण्यात आले आहेत. स्लीप रोड बदलला आहे. त्या पुलाचा उतार धोकादायक असल्याच्या काही तक्रारी आहेत.
उड्डाणपुलाला ‘अपरिहार्य’ वळण
By admin | Updated: April 29, 2016 23:56 IST