उस्मानाबाद : समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्हमध्ये मुदत करार नियमाप्रमाणे गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचे पैसे तातडीने देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी भारतीय परिवर्तन सेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भापसे पक्षाचे अध्यक्ष दीपक ताटे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजर्षी शाहू चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला असता तेरणा कॉलेज, शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पक्षप्रमुख दीपक ताटे म्हणाले की, समृद्ध जीवन या कंपनीमध्ये लाखो कामगार, कष्टकरी शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीच्या मुदती संपल्यानंतरही संबंधितांना पैसे परत मिळत नाहीत. गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु पदरी निराशा पडत असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. जोपर्यंत सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील अशी ग्वाहीही ताटे यांनी दिली. यानंतरही पैैसे परत न मिळाल्यास १५ नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदार जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश पंचरास, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण झाडे, कळंब शहराध्यक्ष महादेव सुतार, हणुमंत जाधव, वंदना पाटील आदींची उपस्थिती होती.(वार्ताहर)
भारतीय परिवर्तन सेनेचा मोर्चा
By admin | Updated: September 30, 2016 01:18 IST