नांदेड : राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार प्रदान केलेत़ डॉ़ नरेंद्र दाभोलकर हे घटनेच्या बाहेर जावून काम करत नव्हते़ समाजविघातक सनातनी वृत्तीकडून त्यांचा खून झाला़ दाभोलकरांचे परिवर्तनवादी विचार समाजात रुजण्यासाठी स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक होणे गरजचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ़ बाबा आढाव यांनी केले़ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ़ व्यंकटेश रुख्माजी काब्दे यांना पहिल्या डॉ़ नरेंद्र दाभोलकर विवेकभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ़ बाबा आढावा यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले़ कुसूम सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील होते़ मंचावर अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, डॉ़ हंसराज वैद्य, डॉ़ लक्ष्मण शिंदे, गुणवंत पाटील हंगरगेकर, हनुमंत पवार, डॉ. किरण चिद्रावार, डॉ़ कुंजम्मा काब्दे यांची उपस्थिती होती़ मार्गदर्शनपर भाषणात डॉ़ बाबा आढाव यांनी सनातनी वृत्तीवर कडाडून टीका केली़ डॉ़ दाभोलकर यांची हत्या होवून वर्षभराचा कालावधी लोटला़ मारेकरी कोण होते, यापेक्षा या कृत्यामागे कोणाचा हात होता हे शोधणे महत्त्वाचे आहे़ मात्र या प्रकरणाचा तपास लावण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे़ जगातील दहशतवाद संपवण्याची भाषा केली जात आहे़ गल्ली बोळातील दहशतवाद संपवण्यात अपयशी ठरलेली यंत्रणा जगातील दहशतवाद कसा संपवणार असा प्रश्न आढाव यांनी उपस्थित केला़ भारताचे संविधान स्वातंत्र्य, समता, बंधूता, विज्ञानभेद, समाजवाद मुल्यांवर आधारीत आहे़ याची अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे़ सर्वांना समानतेने स्वतंत्र विचारानिशी जगण्याचा अधिकार आहे़ असे असताना परिवर्तनवादी विचार संपवण्याच्या उद्देशाने दाभोलकर यांचा खून करण्यात आला़ हे कृत्य घटनेला अनुसरुन नाही़ स्वातंत्र्यमुल्य कितपत रुजलीत हे यावरुन स्पष्ट होते़ समाजाचा सर्वांगीन विकास होण्यासाठी जात-पात, अन्य भेदभाव बाजूला सारुन चांगल्या मुल्यांची रुजवण होणे गरजचे असल्याचे बाबा आढाव यांनी सांगीतले़ अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजाला जागृत करण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगीतले़ परीवर्तनवादी विचारसरणीची माणसं दाभोलकरांनी जोडली़ कोणताही बदल घडवण्याची ताकद तरुणांच्या हाती आहे़ नेमकी हीच बाब ओळखून अंनिस चळवळीची धुरा दाभोलकरांनी तरुणांच्या हाती सोपविली़ त्यामुळेच ही चळवळ प्रभावी ठरत आहे़ डॉ़ व्यंकटेश काब्दे म्हणाले, समाजसुधारक, विचारप्रवर्तकांची मोठी परंपरा देशाला लाभली आहे़ आपल्या जीवनांवर सभोवतालच्या अनेक गोष्टींचा पगडा असल्याचे जाणवते़ श्रद्धा असावी मात्र ती अंधश्रद्धा बनू नये यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे़ दाभोलकरांच्या नावाने झालेला सन्मान सर्व समाजाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगीतले़ सदाशीवराव पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला़ प्रकाश पाईकराव यांनी वैज्ञानिक प्रात्यक्षिक करुन दाखविले़ यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक व्हावी
By admin | Updated: September 5, 2014 00:09 IST