सितम सोनवणे , लातूरशहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाचा जैविक वैद्यकीय कचरा नष्ट करणारी मशीन बंद आहे. त्यामुळे रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट खाजगी संस्थेकडून लावण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून कचरा नष्ट करण्यासाठी ६० हजार रूपये प्रति महिना खर्च रुग्णालयाला सोसावा लागत आहे. चार वर्षांत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अडीच कोटी रुपये गेले आहेत.जिल्हा रूग्णालयात इन्सीरेटर मशीन ३१ मार्च २००५ मध्ये सुरू करण्यात आली होती़ ही मशीन चेन्नईच्या कंपनीकडून खरेदी करून सोलापूरच्या वितरकांमार्फत बसविण्यात आली होती़ मशीन दोन वर्ष व्यवस्थित चालू होती़ त्यानंतर ही मशीन दोन वेळा बंद पडली़ तेव्हा वितरकांनी चेन्नईच्या कंपनीकडून दुरुस्ती करून घेतली़ याच काळात हे जिल्हा रूग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात विलीन करण्यात आले़ त्यांनतर ही इन्सीनरेटर मशीन खराब होत राहिली, तिच्या दुरुस्तीचा खर्च आरोग्य विभागाला परवडेनासा झाला़ जिल्हा शल्याचिकित्सकांनी बसविलेल्या या मशीन चे मेन्टेनन्स व दररोज लागणारे १०० लिटर डिझेलसाठीचे बजेट वाढत गेले़ मनुष्यबळ उपलब्ध नाही म्हणून तत्कालीन अधिष्ठातांनी २०११ पासून एका खाजगी कंपनीस जैवीक वैद्यकीय कचरा भस्म करण्याचे काम दिले. दररोज हा कचरा सुमारे २०० किलो कचरा निघतो. हा नष्ट करण्यासाठी प्रति महिना ६० हजार रूपये खर्च येतो. हा प्रतिवर्षी सात लाख वीस हजार रूपये होतो़ मागील चार वर्षांपासूनचा हिशेब केला असता तो २ कोटी ५९ लाख २० हजार रूपये होतो़ प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. ती याही रुग्णालयात आहे. परंतु, यंत्र बंद पडल्याने ती बारगळली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे मागील चार वर्षांपासून एका खाजगी संस्थेकडून जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. यामुळे नाहक रुग्णालयाला दरमहा ६० हजारांचा खर्च सहन करावा लागतो.
महाविद्यालयाच्या मालकीचे भस्मीकरण यंत्र नादुरुस्त
By admin | Updated: January 16, 2015 01:09 IST