औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. या निर्बंधांवर व्यापारी, सर्वसामान्य नागरिक नाखूश असले तरी प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट फक्त ०.८९ टक्के असला तरी महापालिकेने तपासण्याचे प्रमाण कमी केले नाही. उलट यामध्ये किंचित वाढच दिसून येत आहे. दररोज जवळपास दोन हजार नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टअखेर येईल, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. राज्य शासनाने महापालिकेला यापूर्वीच सतर्क केले आहे. त्यादृष्टीने महापालिकेने मेल्ट्रॉन येथे छोटा ऑक्सिजन प्लांट सुरू केला. आणखी एक मोठा प्लांट सुरू करण्यात येणार आहे. गरवारे कंपनीच्या परिसरात बाल कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. एमजीएम परिसरात एक सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. लहान मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती घेत महापालिकेने ८ डॉक्टरांची टीम तयार ठेवली आहे. शहराच्या ६ प्रवेशद्वारांवर कोरोना तपासणीसाठी पथके तैनात ठेवली आहेत. रेल्वेस्टेशन, विमानतळासह शहरातील ९ शासकीय कार्यालयात दररोज अभ्यागतांची तपासणी केली जात आहे. शहरात नव्याने सापडलेल्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या मोबाईल टीमद्वारे तपासणी केली जात आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसते आहे. तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता रुग्णांची संख्या घटली तरी दीड ते दोन हजारपेक्षा अधिक व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहीमही सुरू आहे.
पाच दिवसांतील कोरोना तपासण्या
जुलै - तपासणी संख्या
दि.१३ - १८०३
दि.१४ - १७१८
दि.१५ - १७५७
दि.१६ - २०६०
दि.१७ - १५७०