बाजारसावंगी : चालू वर्षात डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने शेतीमशागतीचे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. नांगरणी, रोटा, पेरणी, वखरणी आदी दरात वाढ झाली झाल्यामुळे बैलांच्या साहाय्याने पेरणी करणे परवडेल, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यापूर्वी शेती ही प्रामुख्याने बैलजोडीच्या साहाय्याने केली जात होती. मात्र, कालौघात जग वेगवान झाल्याने शेतकऱ्यांनीही तात्काळ व पारंपरिक पद्धतीपेक्षा चांगली पेरणी, वखरणी, नांगरणी करता येते, म्हणून ट्रॅक्टरला पसंती दिली. ग्रामस्तरावरील प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसले तरी, इतर शेतकऱ्यांकडून भाड्याने ट्रॅक्टर लावून शेतकरी शेतमशागतीची कामे करून घेतात. मात्र, सध्या डिझेल, पेट्रोलदर हे आकाशाला भिडले असल्याने ट्रॅक्टरधारक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यामुळे ट्रॅक्टरद्वारे केल्या जात असलेल्या शेतमशागतीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी नांगरणीचे दर १ हजार रुपये होते. ते सध्या बाराशे ते चौदाशे झाले आहेत. मोगडाचे दर यापूर्वी आठशे ते नऊशे रुपये होते. ते सध्या हेच दर १ हजार रुपये झालेले आहे. रोटाव्हेटरमुळे शेती पेरणीसाठी ताबडतोब तयार होत असल्यामुळे रोटाव्हेटरला शेतकरी अधिक पसंती देत आहेत. रोटाव्हेटरचे यापूर्वीचे दर हे नऊशे ते १ हजार रुपये प्रतिएकर होते. सध्या रोटाव्हेटरचे दर बाराशे ते चौदाशे रुपये झालेले आहेत. पेरणीसाठी आठशे ते नऊशे रुपये दर होते, तर सध्या हेच दर १ हजार ते बाराशे रुपये झालेले आहेत. या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. अतिवृष्टी, हवामानातील बदल आदी कारणांमुळे अगोदच शेतकी त्रस्त असताना आता मशागतीचे दरही वाढले असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
चौकट
अल्पभूधारक शेतकरी जनावरे ठेवत नाहीत
सध्या सर्वत्र ट्रॅक्टरद्वारे शेतीची कामे केली जात असल्याने शेतकऱ्यांनी जनावरे बाळगणे कमी केले आहे. अल्पभूधारक शेतकरी तर आता जनावरे बाळगतच नाहीत. पूर्वी सर्व शेतकऱ्यांकडे बैलजोडींसह, गायी, म्हशी राहत होत्या. आता हे प्रमाण कमी झाले आहे.
कोट
यांत्रिक शेतीकडे कल वाढल्याने शेतकरी आता ट्रॅक्टद्वारेच शेतीची मशागत, पेरणी करीत आहेत. मात्र, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे दरही वाढले आहेत. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. डिझेलचा दर लवकरात लवकर कमी व्हावा, जेणेकरून शेतीवरील खर्च कमी होईल.
-भगवान कामठे, शेतकरी, कनकशीळ
कोट
एकीकडे डिझेलचे दर वाढविल्याचे कारण पुढे करीत ट्रॅक्टरमालकांनी शेतीमगशागतीचे दर वाढविले आहेत. मात्र, या तुलनेत शेतमालाचे भाव वाढलेले नाहीत. यामुळे तोटा शेतकऱ्यांचाच होत आहे.
-भिकनराव घुले, शेतकरी, बाजारसावंगी
कोट
दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे कमी दरात मशागत परवडत नाही. त्यामुळे नाइलाजाने ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाऱ्या मशागतीचे दर वाढवावे लागत आहेत. हे दर शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक असले तरी, आम्हाला त्याशिवाय पर्याय नाही.
-बबनराव नलावडे, ट्रॅक्टरमालक, बाजारसावंगी
चौकट
यापूर्वी शेतमशागतीचे दर प्रतिएकर
मशागत २०२० २०२१
नांगरणी १,००० रुपये १,४०० रुपये
रोटा ९०० रुपये १,४०० रुपये
मोगडा ९०० रुपये १,००० रुपये
पेरणी ९०० रुपये १,२०० रुपये