तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषदेची स्पेशल शाळा सुरु करण्यात आली आहे. मात्र, निधी मंजूर होऊनही येथे प्रसाधनगृहाचे काम झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.तेर येथे २०१३ मध्ये जि.प.ची स्पेशल शाळा सुरु करण्यात आली आहे. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग सुरु करण्यात आले आहेत. शाळेची पटसंख्या दोनशेवर पोहोचली आहे. यामध्ये ८५ मुली तर ११५ मुलांचा समावेश आहे. विद्यार्थी संख्या लक्षात घेता, २०१३ मध्ये सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रसाधनगृह बांधण्यासाठी १ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वास्तविक चालू शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी प्रसाधनगृहाचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र घडले उलट. शैक्षणिक वर्ष सुरु होऊन १५ दिवसाचा कालावधी लोटला असतानाही प्रसाधनगृहाच्या बांधकामाला अद्याप सुरुवातही करण्यात आली नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. लघुशंकेसाठी या विद्यार्थ्यांना आडोसा शोधावा लागत आहे. विशेष म्हणजे या शाळेत ७ शिक्षकांचा स्टाफ असून, यामध्ये पाच महिला कर्मचारी आहेत. प्रसाधनगृहाअभावी याही कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. असे असतानाही व निधी मंजूर असूनही प्रसाधनगृह बांधकामाकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकाराबाबत पालकातून तीव्र संताप व्यक्त होत असून प्रसाधनगृहाचे काम तातडीने हाती घेऊन मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
प्रसाधनगृहाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST