हिंगोली : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या २0१0-११ मधील रस्ते दुरुस्ती कार्यक्रमात अनेक कामे पूर्ण झाली नाहीत. अशी कामे रद्द करण्याचा ठराव जि. प. च्या आज झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जि. प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सदस्यांनी ही कामे झाली नसल्याने नव्या कामांचीही अडचण होत असल्याचे सांगितले. तसेच स्पीलमध्ये या कामांवर नाहक खर्च होत असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर २५ लाखांपर्यंतच्या कामांना बांधकाम समितीने मंजुरी दिली. यात जोडरस्ता लोहगाव, आडगाव-भिंगी-लिंबाळा, टेंभुर्णी-कुडाळा, लोहगाव रस्त्यावरील पूल, कुंभारवाडी-येडशी या रस्त्यांची कामे पूरहानी दुरुस्तीच्या निधीतून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ लाखांपर्यंतच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले. तर १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतूनही दोन रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यात फाळेगाव-देवठाणा रस्ता व पिंपळदरी-भटसावंगी ही २५ लाखांपर्यंतची कामे समितीच्या सदस्यांनी मंजूर केली. तर जवळा बाजार-नालेगाव व पांगरा बोखारे या दोन रस्त्यांचे अनुक्रमे १४ व १९ लाखांचे काम कार्यकारी अभियंता स्तरावर मंजुरीसाठी ठेवण्याचे ठरले. या कामांना मात्र मंजुरी देण्यात आली.याशिवाय तीर्थक्षेत्र विकासातील ३ कोटींच्या कामांचा आराखडाही मंजूर करण्यात आला. ही कामे आता निविदा प्रक्रियेत घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रस्ते विकासाचीही एकूण ५८ कामे प्रस्तावित करून त्यांना मंजुरी देण्यात आली. वार्षिक योजनेतून या कामांना निधी देण्यात येणार आहे.(वार्ताहर)
सीआरची अपूर्ण कामे रद्द होणार
By admin | Updated: December 11, 2014 00:24 IST