परभणी : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता़ नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी शासनाने काही निर्देश दिले आहेत़ त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़ बाधीत शेतकर्यांकडून संबंधित बँकांनी ३१ डिसेंबर अखेरपर्यंत सक्तीने कर्ज वसुली करू नये, डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत शेती पिकांच्या कर्ज परतफेड करण्यास मुदतवाढ द्यावी, जे बाधीत शेतकरी पीककर्जाच्या परतफेडीस ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढीचा लाभ घेतील, असे शेतकरी डॉ़ पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजनेस पात्र ठरतील़ तसेच केंद्र शासनाच्या व्याज अनुदान योजनेनुसार पीककर्जाची उचल केल्याच्या दिनांकापासून ३६५ दिवसांत पीककर्जाची परतफेड करणारे शेतकरी केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतील़ ज्या शेतकर्यांनी पीक कर्जाच्या परतफेडीत ३१ डिसेंबर मुदतवाढीचा लाभ घेतला आहे़ अशा शेतकर्यांना थकबाकीदार समजू नये़ जे बाधीत शेतकरी ३० जून २०१४ या मुदतीत पीक कर्जाची परतफेड करतील अशा शेतकर्यांचे नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत संबंधित बँकेला अदा करण्यात येतील़ तसेच क मधील पुनर्गठनाचा पर्याय स्वीकारलेल्या शेतकर्यांचे देखील पुनर्गठनापूर्वीचे उपर्जित व्याज २०१३-१४ या कालावधीतील बाधित पिकांच्या कर्जावरील व्याज शासनामार्फत संबंधित बँकांना अदा करण्यात येते़ बाधित शेतकर्यांच्या कर्जाचे २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या तीन वर्षांच्या काळासाठी पुनर्गठीत करण्यात येईल़ बाधित शेतकर्यांच्या पीक कर्जाचे जून २०१४ नंतर पुढील तीन वर्षांच्या मुदतीसाठी पुनर्गठन करण्यात यावे़ पुनर्गठनाचा लाभ घेणारे शेतकरी २०१४-१५ या हंगामात पीककर्ज घेण्यास पात्र ठरतील़ शासन निर्णयाप्रमाणे आणि सांगितलेल्या अटींप्रमाणे वरील पॅकेज हे बाधित शेतकर्यांना देण्यात येईल, असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे़
गारपीटग्रस्तांच्या पॅकेजची अंमलबजावणी करा
By admin | Updated: May 11, 2014 00:41 IST