लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर कारवाई व्हावी, यासाठी झालेल्या बंद दरम्यान कायदा हातात घ्यायला नको होता. मराठा क्रांती मोर्चातून संपूर्ण जगाला शांतता व शिस्तीचा संदेश गेला होता. दगडफेक, तोडफोडीचे समर्थन करता येणार नाही, असे खा. छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.बंददरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी खा. संभाजी राजे बीडला आले होते. यावेळी त्यांनी अटक असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेऊन विनाकारण कार्यकर्त्यांना गोवण्यात येऊ नये, असे सांगितले. आंदोलनकर्त्यांमध्ये घुसून कोणी तिसऱ्यानेच दगडफेक केल्याचे सांगितले जाते, या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी व दोषींवरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी मी शिवशाहू यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरलो. मात्र, कोठेही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याचे धाडस कसे काय होते? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी संबंधितावर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली.आरोपी कोण, त्याची जात कोणती यापेक्षा त्याने केलेला गुन्हा खुनापेक्षा अधिक गंभीर असल्याचेही ते म्हणाले. सामाजिक सौहार्दता अबाधित रहावी व बहुजन समाज एकसंघ राहवा यासाठी आपण कायम आग्रही असतो. त्यामुळे आंदोलने शिस्तीत व्हावीत. त्यातून सामाजिक एकतेला बाधा पोहोचू नये, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
‘कायद्याचे उल्लंघन करणे गैरच’
By admin | Updated: May 26, 2017 00:26 IST