ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद,दि. २८ : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २१ जुलै रोजी शहरातील ११०१ अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्यासाठी महानगरपालिकेस आदेश दिले होते. या आदेशाची अमलबजावणी करत आज सकाळी १० वाजे पासून महानगरपालिकेने हि धार्मिक स्थळे काढण्यास सुरुवात केली आहे.
या मोहिमेत मनपाची ४ विशेष पथके कार्यरत आहेत. प्रत्येकी १० जणांच्या या पथकात मनपाची अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. नारेगाव, रेल्वे स्टेशन आदी भागातील १५ पेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सध्या सुरु आहे.
खंडपीठाच्या आदेशापासूनच संपूर्ण शहराचे लक्ष या मोहिमेकडे लागले होते. आज अखेर या मोहिमेला मनपाकडून सुरुवात झाली. यावेळी कुठेलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा सहभागी आहे. विशेष बाब म्हणजे हि स्थळे काढताना त्या भागातील नागरिकांचे सहकार्य पथकाला मिळत असल्याचे प्राथमिक चित्र आहे.