वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात खुलेआम जुगार अड्डे सुरू असून अवैध देशी दारूची विक्री जोमात सुरू आहे. अवैध धंदे करणाऱ्यांकडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांना अभय देत असल्याची चर्चा आहे.वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर, रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, पंढरपूर व औद्योगिक परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. रांजणगावात ग्रामपंचायत कार्यालय, कमळापूर फाटा, पवननगर, एकतानगर इ. चार ते पाच ठिकाणी सोरट नावाचा जुगार खुलेआम सुरू आहे. येथे सकाळपासूनच कामगार, लहान मुले, युवक जुगार खेळण्यासाठी गर्दी करतात. जास्त पैसे मिळण्याच्या आमिषापोटी अनेक जण जुगाराच्या आहारी जात आहेत. मोलमजुरी करून आलेला पैसा उधळला जात असल्यामुळे जुगार व्यावसायिकांची चांदी होत आहे. येथे मोठी गर्दी होत असल्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी वाहतुकीच्या कोंडीचा सामना वाहनधारक व नागरिकांना करावा लागत आहे. या जुगार अड्ड्याजवळ मुख्य बाजारपेठ, शाळा व भाजी मंडई असल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या महिला, मुली व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य चौकात सुरू असलेले हे जुगार अड्डे पोलिसांना दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जुगार अड्डे चालविणारे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे कोणी तक्रार करण्यास धजावत नाही.
अवैध धंदे बिनबोभाट
By admin | Updated: December 6, 2014 00:17 IST